हिवरखेड (जि.अकोला) ः हिवरखेड शहरात निकृष्ट रस्त्यांची भरमार झाली असून, निधी कोणताही असो, रस्ता निकृष्ट दर्जाचाच होतो. निकृष्ट दर्जाची पुरेपूर गॅरंटी असल्याने या निकृष्ट रस्त्यांचे उच्चस्तरीय पोस्टमार्टम करा, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
मागील काही वर्षांमध्ये हिवरखेड ग्रामपंचायतला शासनाचा मोठ्या प्रमाणात थेट निधी मिळाला, सोबतच जिल्हा परिषद, आमदार निधी, इत्यादी अनेक प्रकारच्या निधीमधून विविध विकास कामे झाली. ज्यामध्ये गावातील अंतर्गत रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. फक्त मेन रोड वरील काँक्रीट रोड, आमदार निधीतील पेव्हर ब्लॉक आणि काही मोजके इतर चांगले अपवाद वगळले तर जवळपास सर्वच रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. ज्यामध्ये बहुतांश रस्त्यांच्या कामात इस्टिमेट प्रमाणे काम करण्यात आलेले नाही. अनेक रस्त्यामधील लोखंडाच्या बारीक-बारीक छड्या बाहेर पडून अपघातास निमंत्रण देत आहेत. काँक्रीट रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पेवर ब्लॉक चे काम सुरू होताच दबले आहे. मंजुराती पेक्षा सिमेंट काँक्रीटचे थर कमी घेण्यात आलेले आहेत. सिमेंटचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात आल्याने, आणि माती मिश्रित रेती वापरल्याने, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, लाबांच लांब भेगा, मोठमोठे तडे गेले आहेत. मोजमापमध्ये जाडीचा फरक पकडीत येऊ नये म्हणून साईडमध्ये पूर्ण उंची घेण्यात येते तर मधात मुरूमची भरती टाकून त्याच्यावर अत्यंत कमी काँक्रीट टाकण्यात आलेले आहे.
(धीरज बजाज)