सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत अजूनही 'अॅक्शन प्लॅन' का नाही?- खासदार छत्रपती संभाजीराजे
पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेले अनेक दिवस राज्य सरकार टीकेचे लक्ष्य ठरत आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून केला जात आहे. तशातच आज पुण्यात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले. "महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोर्टात जी भूमिका घेतली आहे त्यावरून असं दिसून येतं की सरकारमधील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता. अधिकारी आणि मंत्री यांच्याकडून देण्यात येणाऱ्या माहितीत तफावत दिसून आली. सुनावणीला वकिल हजर नसल्याने सरकार या प्रकरणाबाबत गंभीर नाही हे दिसून आलं. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरक्षणावर स्थगिती दिल्यावर सरकारने आपली भूमिका वेळोवेळी बदलली. सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत 'अॅक्शन प्लॅन का नाही?" असा सवाल संभाजीराजे यांनी केला.