कोल्हापूर - आद्यशक्तिपीठ असलेल्या येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर लोटला होता. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांचे लोंढे येतच होते. एका दिवसात सुमारे लाखावर भाविकांनी गर्दी केल्याने बंदोबस्तावरील पोलिस, देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांसह अनेक सेवाभावी संस्थेच्या लोकांची तारांबळ उडाली. अनेकांनी रविवार या सुटीच्या दिवसाचा मुहूर्त साधल्यामुळे कोल्हापूरने पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी अनुभवली. तीन दिवसांत सुमारे अडीच लाख भाविकांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.