मेट्रो मार्गासाठी खोदकाम सुरू असताना बुधवारी दुपारी मोठ्या आकाराच्या प्राण्यांची हाडं सापडली. त्यामुळे शहरात चर्चेला धुमारे फुटले. सुमारे 200 वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या हत्तीची ही हाडं असल्याचा निष्कर्ष पुरातत्त्व अभ्यासकांनी "सकाळ'शी बोलताना गुरुवारी मांडला. महात्मा फुले मंडई, नेहरू रस्ता या भागात पूर्वी पेशवाई होती. त्यामुळे खोदाई दरम्यान आणखी काही सापडू शकतं, असेही त्यांनी म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गावरील मेट्रोसाठी महात्मा फुले मंडईत खोदकाम सुरू आहे. त्या ठिकाणी मेट्रोचा मार्ग भुयारी असून तेथे भुयारी स्थानकही होत आहे. मंडईत कांदा मार्केटजवळ खोदकाम सुरू असताना बुधवारी दुपारी मोठ्या आकाराची अनेक हाडं सापडली. हे काही तरी वेगळे असावे, म्हणून खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराने महामेट्रोशी संपर्क साधला. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व अभ्यासकांशी संपर्क साधला. त्यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळ आणि हाडांची पाहणी केली, अशी माहिती महामेट्रोचे जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली.
या बाबत पुरातत्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. ते म्हणाले, ""सुरवातीला आम्हाला 10 मीटर खोदकाम केल्यावर हाडं सापडली, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात पाहणी केल्यावर ही हाडं सुमारे 3 मीटर खोदकाम करताना सापडली आहेत. त्यांची पाहणी केल्यावर ती जिवाश्म नाही, असे उघड झाले. मोठी हाडं ही हत्तीची आहेत. तर, दुसरी हाडं ही नीलगाय अथवा गाय, बैलाची असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या बाबत अजूनही तपासणी सुरू आहे.'' सुमारे पन्नास वर्षांपूर्वीही अरण्येश्वरमध्ये सुमारे दहा फूट खोदकाम करताना हत्तीचा सांगाडा सापडला होता.
मध्ययुगीन इतिहासाचे आणि जुन्या पुण्याचे अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, ""मंडईच्या कांदा मार्केटपासून काही अंतरावर नेहरू रस्त्याच्या बाजूला हत्ती महाल नावाची इमारत आहे. पेशव्यांचे हत्ती तेथे बांधले जात. त्यामुळे एखादा मृत्युमुखी पडलेला हत्ती तेथेच खोदकाम करून पुरण्यात आला असावा, असे वाटते.'' मंडईची काही जागा ही पूर्वी पेशव्यांची बाग होती. ती चकले बाग नावाने ओळखली जात. नंतर ती खासगीवाले यांच्याकडे आली. त्यांच?