गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांचं मोठं आव्हान उभं ठाकल्यानं भाजपनं त्यांच्या निवडणूक रणनीतीत बदल केला आहे. गुजरातची लढाई सोपी जावी म्हणून 'एक बुथ, 10 युथ' हे सूत्र घेऊन चालणाऱ्या भाजपने ही रणनीती बदलत आता 'एक बुथ, 30 युथ'चं सूत्रं स्वीकारलं असून बुथ मॅनेजमेंटच्या जोरावरच गुजरात जिंकण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे.
'एक बुथ, दहा युथ' या फॉर्म्युल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचता येत नव्हतं. या सूत्रानुसार एक कार्यकर्ता केवळ 25 ते 30 मतदारांपर्यंतच पोहचू शकत होता. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचता यावं म्हणून भाजपनं आता 'एक बुथ, 30 युथ'चा फॉर्म्युला अंगिकारला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा फॉर्म्युला यशस्वी करण्यासाठी भाजपनं स्थानीक आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधली आहे. या 30 कार्यकर्त्यांच्या टीममधील प्रत्येक कार्यकर्त्याला किमान 25 ते 30 मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक बुथमध्ये पक्षाला 10 टक्के मतं मिळाली तरी 'मिशन-150' यशस्वी होणार असल्याचं भाजप सूत्रांनी सांगितलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews