भिकारी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मंदिरापुढे किंवा रस्त्याच्या कडेला भीक मागणारे लोक दिसतात. आता भिकारी म्हटल्यावर त्यांच्याकडे किती पैसे असणार. दिवसाकाठी काहीतरी खाऊ शकतील इतके पैसे या लोकांना मिळत असतील. पण आता एक गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.म्हैसूर येथील प्रसन्ना अंजनेया या मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या एका भिकारी महिलेने भिकेतून मिळालेल्या पैशांची बचत केली. आता पैशांची बचत केल्यावर ही महिला आपल्यासाठी काहीतरी खरेदी करेल असे आपल्याला वाटेल. पण तसे न करता या महिलेने हे पैसे आपण ज्या मंदिराबाहेर बसतो त्या मंदिराला दान केली. त्यामुळे भिकारी असूनही तिच्यातील दान देण्याची वृत्ती पाहून मंदिर प्रशासनाबरोबरच इतरांनाही धक्का बसला. विशेष म्हणजे तिने मंदिराला दान केलेली रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल अडीच लाख रूपये आहे. या महिलेचे वय 85 वर्षे असून तिचे नाव आहे एम.व्ही. सीता असे आहे.
सुरूवातीला या भिकारी महिलेकडून रक्कम घेण्यास मंदिर प्रशासन तयार नव्हते. मात्र आपली देवावर श्रद्धा असून आपल्याला ही रक्कम मंदिरालाच देण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितल्यावर प्रशासनाने तिची ही मागणी मान्य केली. ती दिवसभर मंदिराच्या बाहेर बसते त्यामुळे मंदिर प्रशासन आता तिची काळजी घेणार आहे. याआधीही गणेशोत्सव काळात तिने या मंदिराला 30 हजार रुपयांची देणगी दिली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews