पाकिस्तानातील पंजाब उच्च न्यायालयाने सुटकेचे आदेश दिल्यानंतर लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने स्वतंत्र काश्मीरचा नारा दिला आहे. भारत सरकार माझे काहीही करू शकत नाही. काश्मीर लवकरच स्वतंत्र होईल, अशी फुकाची बडबड त्याने केली आहे.मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज पाकिस्तानात अनेक वर्षांपासून मोकाट फिरत होता. त्याला यावर्षी जानेवारीत नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पंजाब उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी त्याची नजरकैदेतून सुटका होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. 'हा पाकिस्तानचा विजय आहे. भारत सरकार माझे काहीही करू शकत नाही. काश्मीर लवकरच स्वतंत्र होईल', असे तो म्हणाला.
सुटकेचे आदेश दिल्यानंतर हाफिजने न्यायाधीशांचे आभार मानले आहेत. हा पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचा विजय आहे, असे तो म्हणाला. सईदच्या नजरकैदेत आणखी दोन महिन्यांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी पंजाब प्रांताच्या सरकारने न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews