यावर्षी सलग वेगवेगळे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याचा विराट कोहली ने धडाकाच लावला आहे. दिल्ली च्या फिरोजशाह कोटला मैदानावर श्रीलंके विरुद्ध झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये चौथ्या दिवशी विराटच्या नावावर आणखी एक कारनामा जमा झालाय. चौथ्या दिवशी 50 रन्सची खेळी करत तीन सीरिजमध्ये 600 पेक्षा जास्त रन्स करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीने श्रीलंकेसोबत सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये एकूण 610 रन्स केले आहेत. यासोबतच कोहलीने 2016-17 सत्रात इंग्लंड विरूद्ध 655 आणि 2014-15 सत्रात ऑस्ट्रेलिया विरूद्ध 692 रन्स केले आहेत. कोहलीने कोलकाता टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट होऊनही दुस-या इनिंगमध्ये 104 रन्सची नाबाद खेळी केली. त्यानंतर नागपूरमध्ये त्याने 213 रन्स केले. दिल्ली टेस्टमध्ये कोहलीने पहिल्या इनिंगमध्ये 243 रन्सची खेळी केली आणि लागोपाठ तीन दुहेरी शतकं लगावणारा पहिला कर्णधार बनला. त्यानंतर दुस-या इनिंगमध्ये कोहलीने 50 रन्सची खेळी केली. या सीरिजमध्ये कोहलीने 82.21 च्या स्ट्राईक रेटने 57 चौकार आणि चार षटकार लगावले. कोहलीने पहिल्यांदा एका सीरिजमध्ये 600 पेक्षा जास्त रन्स करण्याचा करिश्मा 2014 मध्ये केला होता. ऑस्ट्रेलिया सोबत ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या चार सामन्यांच्या सीरिजमध्ये कोहलीने आठ खेळींमध्ये 86.50 च्या सरासरीने एकूण 692 रन्स केले होते. या सीरिजमध्ये कोहलीने चार शतकं आणि एक अर्धशतक लगावलं होतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews