काँग्रेसमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेले सोनिया युग समाप्त झाले असून, आजपासून राहुल युग सुरू झाले. राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याची औपचारिक घोषणा आज झाली.अध्यक्षपदासाठी केवळ राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. काँग्रेस मुख्यालयात येत्या शनिवारी (ता. 16) होणाऱ्या सोहळ्यामध्ये राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी काँग्रेस मुख्यालयामध्ये झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या निवडीची घोषणा केली. चार डिसेंबरला राहुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाचे कार्यकारिणी सदस्य, सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आदींनी 89 अनुमोदक संचही दाखल केले होते. पाच डिसेंबरला झालेल्या अर्ज छाननीतूनच अनौपचारिकरीत्या राहुल यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले होते; परंतु निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता स्पष्ट करण्यासाठी अर्ज माघारीनंतरच राहुल गांधींच्या निवडीची घोषणा होईल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात येत होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews