येथील सरकारी रुग्णालयात एका महिलेला आधारकार्डअभावी प्रवेश नाकारण्यात आल्याने तिने आपत्कालीन वॉर्डबाहेर बाळास जन्म दिला. तिच्याजवळ आधार कार्ड नव्हते त्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. ही घटना लक्षात आल्यानंतर गुरगावचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के.राजोरा यांनी सांगितले, की या प्रकरणी डॉक्टर व परिचारिका यांना निलंबित करण्यात आले. मुन्नी केवात या २५ वर्षांच्या महिलेला घेऊन तिचा पती रुग्णालयात आला होता. तिला सकाळपासून प्रसूती वेदना होत होत्या. तिचा पती अरुण केवात याने सांगितले, की आम्ही सकाळी नऊ वाजता रुग्णालयात पोहोचलो व आपत्कालीन विभागात गेलो, तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला प्रसूतिगृहाकडे जाण्यास सांगितले, तेथे गेल्यानंतर त्यांनी आधारकार्ड शिवाय महिलेला दाखल करता येणार नाही, अशी भूमिका घेतली. केवात यांनी आधार क्रमांक देण्याची तयारी दर्शवूनही त्यांनी आधारकार्डच हवे असा आग्रह केला. तेथे असलेल्या महिला डॉक्टर व परिचारिका यांनी आधारकार्ड नसेल, तर तिला दाखल करून घेणार नाही असे सांगितल्यानंतर महिलेच्या पतीने नातेवाइकांना तिच्या समवेत बसवून तो आधारकार्डाची प्रत आणण्यास गेला, तोपर्यंत नातेवाइकांनी तिला आकस्मिक विभागाकडे नेले. तेथेही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews