आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आज चौथा सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता आयपीएलमधील दोन नवे संघ आमनेसामने येणार आहेत. आज गुजरात विरुद्ध लखनऊ सामना होणार आहे. दोन्ही संघ आयपीएलमध्ये नवीन आहेत. त्यामुळे या संघांकडे लक्ष असणार आहे. गुजरात संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे तर लखनऊ संघाचं नेतृत्व के एल राहुल करणार आहे. या दोन्ही संघांनी खेळाडूंवर खूप जास्त पैसे खर्च केले आहेत. तेवढीच दमदार कामगिरी दोन्ही संघ करतात का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. गुजरात संघातून हार्दिक पांड्या मैदानात उतरणार आहे. ऑलराउंडर हार्दिक पांड्या सध्या गोलंदाजी करत नसल्याने तो गोलंदाजीसाठी उतरणार का? याबाबत सगळ्यांनाच सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. गुजरातचं नेतृत्व पांड्याकडे आहे त्यामुळे तो कसे निर्णय घेतो याकडेही लक्ष असणार आहे. राशिद खान यंदा गुजरात संघाकडून खेळताना दिसणार आहे. गेल्यावर्षी तो हैदराबाद संघाकडून खेळला होता. त्याने 14 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्व फलंदाज जरा घाबरूनच असतात. लखनऊ संघाकडून के एल राहुल आहे जो उत्तम आणि धडाकेबाज फलंदाज आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात त्याने उत्तम कामगिरी केली होती. यासोबत क्विंटन डिकॉक देखील यावर्षी लखनऊमधून खेळणार आहे. डिकॉक मेगा ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू लखनऊ संघाने आपल्याकडे घेतला आहे. दोन्ही संघानी महालिलावात अनेक तगडे खेळाडू आपल्या ताफ्यात सामिल केले आहेत. त्यामुळे आजची ही लढत चुरशीची होणार यात शंका नाही.