गुजरातमध्ये मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या अहमदाबाद शहरात काल संध्याकाळी झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसानं शहर जलमय झालंय. अहमदाबादच्या रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यानं वाहनंही पाण्यात आहेत. पावसाच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील ४८ जणांची फायर ब्रिगेडच्या जवानांनी सुटका केली. गुजरातच्या वलसाडमध्ये पूरस्थिती आहे. काही भागात घरांत पाणी शिरलंय. ओरंगा नदी दुथडी भरून वाहतेय. नदीचं पाणी जिल्ह्याच्या अनेक भागात शिरलंय. तुलसी नदीलाही पूर आलाय. तर नवसारीमध्येही पूरस्थिती आहे. पूर्णा नदीला पूर आलाय. काल तिथं अकराशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.