ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे आजपासून शिवसंवाद यात्रेसाठी निघाले आहेत. नाशिकच्या इगतपुरीहून या यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेच्या या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, जालना आणि बीडमधील काही गावांमधून ही यात्रा आणि आदित्य ठाकरेंच्या सभा होणार आहेत. इगतपुरीमध्ये यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने झालेल्या सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, शिवसेनेत कोणताही गट नसून जे गेले ते गद्दार आणि राहिले ते शिवसैनिक असल्याचंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.