मीरा भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला अखेर परवानगी, मंत्री प्रताप सरनाईक यांना पाहून 'गद्दार'च्या घोषणा

ETVBHARAT 2025-07-08

Views 1

मीरा भाईंदर : शहरात मंगळवारी (8 जुलै) मराठी भाषिकांकडून मोर्चाची हाक देण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून या मोर्चाला सुरुवातीला परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही मोर्चा काढण्याचा निर्णय मराठी बांधवांकडून घेण्यात आला. या परिसरात मराठी जनतेची प्रचंड गर्दी झाली होती. अशा स्थितीत सकाळी 9 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. अखेर नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेऊन दुपारच्या सुमारास मोर्चाला परवानगी देण्यात आली. त्यानंतर मीरा रोडच्या ओम शांती चौकापासून ते मीरा रोड रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं मराठी बांधव सहभागी झाले. सकाळी ज्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती, त्या सर्व कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आलं. मराठी भाषिकांची एकजूट पाहून सरकार बिथरल्याचा यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दावा केला. या मोर्चामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाच्या भीतीपोटी मीरा रोड येथील बालाजी हॉटेल परिसरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. मीरा रोडवरील बालाजी हॉटेलपासून सुरू झालेला हा मोर्चा मीरा रोड स्थानक परिसरातील शहीद कौस्तुभ राणे चौकात पोहोचला. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक हे मोर्चाच्या ठिकाणी आले असता, मराठी बांधवांनी सरनाईकांना पाहून 'चले जाव'च्या घोषणा दिल्या. तसंच, '50 खोके एकदम ओके' 'गद्दार' अशा घोषणादेखील मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या यावेळी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर मंत्री प्रताप सरनाईक निघून गेले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS