जालना : शहरातील अंबड चौफुली जवळ एका 30 वर्षीय तरुणाच्या डोक्यात गोळी झाडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सागर श्रीराम धानुरे असं या तरुणाचं नाव आहे. जालना येथील भवानीनगर इथं राहणारा सागर धानुरे हा शनिवार रात्रीपासून बेपत्ता होता. त्याचं कुटुंब आणि मित्र त्याचा शोध घेत होते. कलावती हॉस्पिटल समोरील रस्त्यावर एक कार बराच वेळ संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारची तपासणी केली असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सागर आढळून आला. याची माहिती तत्काळ कदिम पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि याची माहिती फॉरेन्सिक टीमला दिली. मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. कारमध्ये सदर तरुणाच्या बाजूलाच एक गावठी कट्टा आणि दोन मोबाईल आढळून आले आहेत. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी दिली.