पुणे : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे जोर लावला असून, ठिकठिकाणी रोड शो तसेच सभांचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात बुधवारी प्रभाग क्रमांक 24 मध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सदानंद शेट्टी यांनी पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यास आमच्या प्रभागातील जुन्या बाजाराचं पुनर्वसन करणारा असल्याचा शब्द नागरिकांना दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 24 येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सदानंद शेट्टी यांनी अजित पवार यांना त्यांनी केलेल्या विकासकाम तसेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या आणि झोपडपट्टी येथील समस्या सांगत या सर्व समस्या येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोडवायचे असल्याचं सांगितलं.