बीड - आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी ग्रामस्थांच्या गायरान क्षेत्रावर सौर प्रकल्प उभा राहत आहे. गेल्या सहा महिन्यापासून या प्रकल्पाला ग्रामस्थ विरोध करत आहेत. मात्र, संबंधित कंपनी ग्रामस्थांची कसल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत. एकीकडं पाहायला गेलं तर या गायरान जमिनीवर या गावातील नागरिकांची उपजीविका चालते, कारण शेळी पालन व गोपालन या गायरान जमिनीवर केलं जातं. त्यामुळं या गावातील अनेक लोक आता या प्रकल्पाला विरोध करत आहेत.
या गावातील जे शेळीपालन, गाय पालन करणारे नागरिक होते त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या प्रकल्पामुळं आमच्या खासगी जमिनीमध्ये जाण्या-येण्यासाठी रस्त्याची अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे जे पाणी आहे ते पाणी आम्हाला घेऊन जाता येणार नाही. त्याचबरोबर गावातील एकही तरुण या प्रकल्पात रोजगारासाठी घेतलेला नाही. आमच्या गावातील गायरान जमीन चालली आहे याचा आम्हाला कसलाच फायदा नाही. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देखील दिले आहे. मात्र, त्याचं आम्हाला काही प्रत्युत्तर मिळालेलं नाही, उलट आमच्यावरच कंपनीचे अधिकारी ॲक्शन घेत आहेत, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.