रायगड - जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा आणि धक्कादायक हादरा बसला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या स्नेहल जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या निजामपूर गावातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या सामूहिक प्रवेशामुळे महाड तालुक्यातील बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली असल्याचं चित्र आहे.
“ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा प्रवेश शिवसेनेची ताकद दाखवणारा आहे.बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीच्या जागांवर शिवसेनाच झेंडा फडकवणार, आणि चेतन औकीरकर यांच्या पत्नी मंदा ढेबे तसेच अनिल जाधव यांच्या विजयावर कोणतीही शंका नाही,” असा ठाम विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे केवळ निजामपूरच नाही, तर संपूर्ण महाड पट्ट्यात राष्ट्रवादीला जबर धक्का बसल्याचं बोललं जात आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय भूकंपामुळे रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.