बेळगाव, ता. 9 ः गोवावेस येथे स्मार्ट सिटीअंतर्गत खाऊ कट्याचे काम सुरु आहे. मंगळवारी (ता.9) सकाळी साडेसातच्या सुमारास कुपनलिका खोदाईच्या कामावेळी पाणी पुरवठा मंडळाची मुख्य जलवाहिनी फूटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. मुख्य जलवाहिनी असल्याने पाण्याचे फवारे सुमारे 80 ते शंभर फुटापर्यंत उडत होते. गोवावेस मुख्य रस्त्याला काही वेळ तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते.
गोवावेस येथे चार दिवसांपूर्वी खाऊ कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. काही गाळ्यांचे काम अजूनही सुरु आहे. प्रत्यक्षदर्शनिकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी कुपनलिका खोदाईचे काम सुरु होते. खोदाई करतेवेळीच मुख्य जलवाहिनी फूटली. सुमारे अर्धा तास पाण्याचे फवारे उडत होते. सकाळी 8.10 मिनीटांनी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर पाणी बंद करण्यात आले. तो पर्यंत लाखा लिटर पाण्याची नासाडी झाली होती. स्मार्ट सिटीच्या या गलथान कारभाराचा फटका बेळगावकरांना बसला आहे.