कोल्हापूर - जुलैच्या 27 तारखेला श्रावण सोमवार व्रताला प्रारंभ होत आहे; मात्र तत्पूर्वी दर्श अमावस्येनंतर म्हणजे, 20 तारखेनंतर कोणीही मांसाहार करत नाही. यासाठी आज रविवारचा दिवस म्हणून लक्ष्मीपुरीतील शिवाजी तंत्रनिकेतनच्या बाजूला कोंबडी बाजार भरला होता. लॉकडाऊन अन् कोविड-19 चा प्रभाव कोंबडी बाजारावर दिसत होता. लोक कमी प्रमाणात कोंबडी बाजाराकडे फिरकले होते. काळी तलंगी, कोंबडा, उफराटे पिसाचे कोंबडे विक्रीसाठी होते. सर्वसाधारणपणे 250 ते 500 रुपयांपर्यंत कोंबडी/कोंबड्यांचा दर होता. कोंबडी अन् कोंबडा वजनाने जास्त, थोडा मोठा असेल तर किंमतही जास्त होती; पण थोडीसी घासाघीस करुन विक्रेते कोंबडी/कोंबडा विकत देत होते. या कोंबड्या जिल्ह्यातून तसेच नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून इथे विक्रीसाठी आणले जातात. श्रावणाला एक आठवडा असल्यामुळे अनेकांनी कोंबड्याच्या रस्सा ओरपण्याचा आनंद ही लुटला. असा हा कोंबडी बाजार शहरात अनेक ठिकाणी बसतो. सर्वाधिक कोंबड्या विक्रीचे प्रमाण हे लक्ष्मीपुरी, मटण मार्केट परिसरात अधिक असते.
रिपोर्टर : अमोल सावंत