गुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून पाटीदार समाजाला ‘हार्दिक’ पाठिंबा दिला जाणार आहे. भाजपविरोधात पाटीदार समाजाला समर्थन देऊन शिवसेनेकडून हार्दिक पटेलला मदत करण्यात येणार आहे, असे पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
शिवसेना-भाजपमधील मतभेद वाढत असून गुजरात निवडणुकीमध्येही शिवसेना भाजपविरोधी भूमिकेत राहणार आहे. महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांची युती तुटलेली असून निवडणुका परवडणाऱ्या नसल्याने सध्या केवळ भाजप सरकारला पाठिंबा असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले. अन्य राज्यांमधील निवडणुका शिवसेनेने नेहमीच भाजपविरोधात लढविल्या आहेत व अन्य पक्षांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची गुजरातमध्ये काहीच ताकद नसल्याने निवडणुका लढविण्याचा प्रश्न नाही. पण भाजपविरोधाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हार्दिक पटेलला व पाटीदार समाजाला भाजपविरोधात समर्थन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. हार्दिक पटेल याने नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला होता. ठाकरे यांनी त्या भेटीप्रसंगीच हार्दिकला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. गुजरातच्या आगामी निवडणुकीत पाटीदार समाजातील या नेत्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.