महाराष्ट्राची शान आणि 'रुबाबदार' अशा कोल्हापुरी चपलेला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान आणि मान मिळवून देण्याचा महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा प्रयत्न आहे. पारंपारिक आणि मूळ सौंदर्य ही वैशिष्ट्ये जपत चपलेचा 'मेकओव्हर' केला जाणार आहे. त्यानंतर बाजारपेठांमध्ये कलात्मक कोल्हापुरी या ब्रँडने तिची विक्री केली जाणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं कोल्हापूरच्या कारागिरांसाठी खास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यात पॅरिस मधील डिझायनर नेओना स्कोन या मार्गदर्शन करतील. कोल्हापुरी चपलेचा आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक व्यापारी, कारागीर, तज्ञांसह 'बाटा' आणि अन्य प्रसिद्ध पादत्राणे कंपन्याचीही मदत घेतली जाणार आहे. ही कार्यशाळा डिसेंबर मध्ये घेण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या कार्यकारी अधिकारी रिचा बागला यांनी दिली. कोल्हापुरी चपलेन आपले वैशिष्ट्य टिकवून ठेवले असले तरी काळानुरूप या व्यवसायाला फटका बसत असल्याचे दिसतं. त्यामागील कारणे या कार्यशाळेतून जाणून घेतली जाणार आहेत. पारंपारिक आणि मूळ सौंदर्य जपून कोल्हापुरी चपलेचे रूप बदलण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews