सचिन- कोहली यांच्यात नेहमीच तुलना होते
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरे करणाऱ्या सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम आजही अबाधित आहे. विक्रमवीर सचिननं आजच्याच दिवशी अहमदाबादच्या मैदानात 30 हजार धावांचा टप्पा पार केला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिनला 30 हजार धावांचा टप्पा पार करण्यास 35 धावांची आवश्यकता होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सचिनने विक्रमी धावांचा टप्पा पार केला. या सामन्यात सचिनने कारकिर्दीतील 88 वे शतक साजरे केले होते. हा सामना अनिर्णित राहिला होता. 2009 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात अहमदाबादच्या मैदानावर 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. पहिल्या डावात सचिन तेंडुलकर अवघ्या 4 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर त्याने 100 धावांची खेळी केली.आता देखील श्रीलंका भारत दौऱ्यावर आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आज पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरला. या सामन्यात पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या विराटनं नाबाद शतकी खेळी केली. ज्याप्रमाणे श्रीलंकेविरुद्ध सचिननं विक्रमी धावांचा टप्पा ओलांडला होता. त्याप्रमाणे विराटने कारकिर्दीतील 50 शतकांचा टप्पा ओलांडला. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या विराटने दुसऱ्या डावात 104 धावांची खेळी करत सामन्यात एकूण 104 धावा केल्या. 8 वर्षांपूर्वी अहमदाबाद मधील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत सचिनने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 100 अशा एकूण 104 धावा केल्या होत्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews