भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची बुधवारी भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30MKI या जेट विमानावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली. सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली. आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारताने पहिल्यांदाच जेट विमानाचा अशा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन इतिहास घडवला.
मध्यम पल्ल्याच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी भारताच्या अंतराळ संशोधन कार्यातील मैलाचा दगड मानला जात आहे. हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र दहशतवाद्यांची ठिकाणे अचूकरित्या भेदू शकते. हवेतून दहशतवाद्यांचे असे अड्डे उध्वस्त करण्याबरोबरच जमिनीखालील बंकर्सही उद्धस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे . भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त निर्मिती असणाऱ्या ब्राह्मोसच्या अशा आणखी दोन चाचण्या घेण्याचा भारताचा मानस आहे.
या यशस्वी कामगिरीनंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी प्रतिक्रिया दिली असून भारताने विश्वविक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांनी ब्राह्मोसचे निर्माते आणि डीआरडीओच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews