शतप्रतिशत महिलाराज असणाऱ्या मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. पूर्णपणे महिला कर्मचारी असणारं हे देशातलं पहिलं रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर प्रवाशांना तिकीट देण्यापासून ते प्रवाशांची सुरक्षा वाहण्यापर्यंतचे प्रत्येक काम महिला कर्मचारी करत आहेत.दररोज ३० ते ३५ हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या आसपास महिला कर्मचाऱ्यांच्या हाती कारभार सोपवण्यात आला होता. सर्व कामाकरिता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून महिला सक्षमीकरणाचा नवा पायंडा घातल्याबद्दल देशभरातून मध्य रेल्वेचं कौतुक करण्यात आलं होतं. या स्थानकात ३४ महिला अधिकारी-कर्मचारी काम पाहत आहेत. यात महिला स्टेशन मास्तरसह ११ तिकीट आरक्षण कर्मचारी, ७ तिकीट तपासनीस, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, २ उद्घोषणा करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अन्य कामांसाठी ५ ‘पॉइंट्समन’ यांचा समावेश आहे. तर प्रवाशी व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ५ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आल्या आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews