अग्निशमन दलामुळे वाचला मांजरीच्या पिल्लाचा जीव
स्वप्नपूर्ती सोसायटीत चालले दोन तास बचाव कार्य
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : धावपळीमुळे व्यस्त झालेल्या मानवी आयुष्यातही वन्यजीवांना वाचवण्याचे काम सिडकोच्या खारघर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी केले आहे. खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत १२ व्या मजल्यावर अडकलेल्या एका मांजरीच्या पिल्लला जीवनदान देण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी केले आहे. तब्बल दोन तास चाललेल्या या थरारक बचाव कार्यात अखेर ब्रान्टो लिफ्टच्या सहाय्याने सज्जावर अजकलेल्या मांजराची सुटका झाली.
अग्मिशन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत इमारतच्या १२ मजल्यावर पिल्ला वाचवण्यासाठी खिडकीतून एक फळी सज्जापर्यंत नेली. परंतू रात्रभर थंडीने कुडकुडत असणाऱ्या त्या पिल्लाला फळीवर चालता येत नव्हते. तसेच फळीवरून चालताना तोल जाऊन खाली पडण्याचा धोकाही होता. पिल्ला वाचवण्याचा अग्निशमन दलाचा प्रयत्न सुरु असताना इतक्यात रहीवाशांची गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत अखेर अग्मिशमन दलाने ब्रान्टो लिफ्ट मागवली. परंतू अनेकांनी त्यांची वाहने पार्कींगच्या जागेत सोडून गेल्याने ब्रान्टो लिफ्ट उभी करण्याचा प्रसंगी निर्माण झाला होता. असा परिस्थितीत सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ब्रान्टो लिफ्टचा तंत्रज्ञानाच्या वापराने अगदी कमी जागेतही सहजरित्या ब्रान्टो लिफ्ट उभी केली. ब्रान्टो लिफ्टच्या सहाय्याने १२ व्या मजल्यावर पोहोचून अडकलेल्या मांजराच्या पिल्ला सुखरुप बचावण्यात आले. या प्रकरणी अग्निशमन दलाला दूरध्वनीहून संपर्क साधणाऱ्या त्या दाम्पत्याचे रहीवाशांकडून कौतूक करण्यात आले. या प्रसंगी अग्निशमन दलाचे अग्निशन केंद्र अधिकारी पी.बी बोडके, लिडींग फायरमन आर.एच बाल्मिकी, जे.सी राजपूत, यंत्र चालक के.डी. म्हात्रे, दुसरे यंत्र चालक पी.एस निकाळे, अग्निशामक आर.डी. कोळी. बी.जे. गडगे, इ.एच तोडरमळ आणि एच. के तरपाडे आदी जणांनी बचावकार्य केले.
( व्हिडिओ : सुजीत गायकवाड)