Pune News | या देवमाणसामुळे ८ वर्षांच्या मुलीचे वाचले प्राण | Sakal Media
राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण सुरु असतानाच पुण्यात माणुसकी धर्माचं दर्शन घडलं. १४ एप्रिलला मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वारजेजवळ एक भीषण अपघात झाला. आंबेगावच्या दिशेनं जाणाऱ्या कोथरूडच्या पुराणिक कुटुंबावर काळानं आघात केला. त्यांच्या चारचाकीला ट्रकने मागून जोरात धडक दिली. अपघातावेळी पुराणिक दाम्पत्य आणि त्यांच्या २ मुली गाडीत होत्या. ट्रकच्या धडकेत चौघेही जखमी झाले. पण अपघातात मनोज पुराणिक यांच्या ८ वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाली होती आणि रक्तस्त्रावही होत होता. अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. या वाहतूककोंडीतून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणे शक्यच नव्हते. वाहतूक कोंडी झाल्यामुळे वारजे वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले खरे, पण गर्दी इतकी भयानक होती, की त्यांनादेखील हालचाल करणे शक्य होत नव्हते. पण याचवेळी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांनी समयसूचकता दाखवत त्या ८ वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेतलं आणि थेट रुग्णालय गाठलं. समीर बागसिराज यांनी केलेल्य़ा मदतीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.