Pune Metro:मेट्रोचे भुयार पोचले कसबा पेठेपर्यंत |kasba peth | pune| Metro| Sakal Media
पुणे (Pune) - पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या सहा किलोमीटर भुयारी मार्गाचे काम कसबा पेठेपर्यंत गुरुवारी पूर्ण झाले. भुयारी मेट्रोसाठी १२ पैकी ७ किलोमीटर मार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे भुयारी मेट्रोसाठी खोदाईचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, शिवाजीनगर न्यायालय, बुधवार पेठ (कसबा पेठ), महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी ३ टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येत असून त्यांनी आत्तापर्यंत ७ किमीचा (१२ किमी पैकी) भुयारी मार्ग तयार केला आहे. दोन टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाचे काम सुरू झाले असून एक टनेल बोरिंग मशीन स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे. कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्ग तयार करणारे टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ येथे गुरुवारी पोचले. मेट्रोच्या तांत्रिक भाषेत यास 'ब्रेक थ्रू' म्हंटले जाते. कृषी महाविद्यालय येथून २९ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिले टनेल बोरिंग मशीन "मुठा" व गेल्यावर्षी ३० नोव्हेंबर रोजी दुसरे टनेल बोरिंग मशीन "मुळा" ने कामाला प्रारंभ केला. सध्या शिवाजीनगर न्यायालय स्थानक पार करून मुठा नदीच्या खालून बुधवार पेठ स्थानक (कसबा पेठ) येथे "मुठा" टनेल बोरिंग मशीन पोहचत आहे. पुणे मेट्रोच्या कामाचा हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. दुसरे टनेल बोरिंग मशीन "मुळा" लवकरच बुधवार पेठ स्थानकात पोहचणार आहे.
#pune #Punemetro #kasbapeth #metropune