केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर देखील हक्क सांगत कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर शिंदे गट शिवसेना भवन आणि पार्टी फंडवर देखील हक्क सांगणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर आता शिंदे गटाने मोठं विधान केलं आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले, “आमची लढाई ही पक्षाचा फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती. आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह महत्त्वाचं होतं. ते मिळाल्यानंतर आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायची होती म्हमून आम्ही विधीमंडळातील कार्यालयात जमलो होतो. शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. जरी काही लोकांना ती प्रॉपर्टी वाटत असली तरी आमच्यासाठी ती प्रॉपर्टी नाही. शिवसेना भवनाच्या रस्त्यावरुन जरी आम्ही कधी गेलो तर शिवसेना भवनाला नमन करु.”