पारनेर तालुक्यातील राज्य मार्ग पुलाच्या कामात शिलालेखातील राजमुद्राचा अवमान केला गेलाय. त्यामुळे संबंधीत ठेकेदार व संबंधीत अधिकारी यांच्य़ावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निर्मूलन निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केलीय. पारनेर तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेले राज्य मार्ग ५०५४ वर २०१७-२०१८ अर्थसंकल्पातुन ६३.७७ लाख रूपये पुलाचे काम करण्यात आले आहे. या पुलावर जी कोनशीला लावण्यात आली आहे ती उलटी बसविण्यात आली आहे. त्यामुळे या कोनशीलेवर असलेल्या राजमुद्रेचा अवमान झाल्याचे रोडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या कोनशीलेवर तत्कालीन आमदार विजय औटी यांचा नामोल्लेख आहे. मागील काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातच कोनशीलेवर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख करण्यात आला होता. ही चूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिली होती. आता थेट राजमुद्रेचा अवमान झाल्याचे समोर आले आहे