Sanjay Raut on Modi Gov.: सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या भूमिकेवरून संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल!
केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी न्यायव्यवस्थेविषयी आणि सर्वोच्च न्यायालयातील व्यवस्थापनाविषयी केलेल्या विधानांमुळे दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका ठामपणे मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा न्यायपालिका विरुद्ध कायदेमंडळ असा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. किरेन रिजिजू यांच्या विधानांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडलेल्या भूमिकेवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टीकास्र सोडलं आहे. “देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली राहावी, आमचं ऐकलं नाहीत, तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू अशी ही धमकी आहे. आम्हाला हवे तसे निर्णय द्या, आम्ही नंतर तुम्हाला जी राज्यपाल पदं किंवा सरकारी पदं देऊ ती घ्या आणि गप्प बसा. जे हे घेणार नाहीत, स्वत:ची भूमिका मांडत राहतील त्यांना आम्ही सोडणार नाही अशी धमकी देशाचे कायदामंत्री घेत असतील, तर तो या देशाचा, संविधानाच खूप मोठा अपमान आहे" अशी प्रतिक्रिया राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली