तामिळनाडू व केरळ या दोन राज्यांतील किनारपट्टीला मोठा तडाखा देऊन महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकू लागलेले ओखी चक्रीवादळ मुंबईपासून समुद्रात सुमारे दोनशे किमी अंतरावर असताना शमल्याने धास्तावलेले तमाम मुंबईकर, तसेच कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी मंगळवारी सुटकेचा निःश्वास सोडला. शमलेले हे चक्रीवादळ अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात गुजरातच्या दिशेने सरकले असले, तरी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात आज, बुधवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ओखी चक्रीवादळाने तामिळनाडूत 10, तर केरळमध्ये 29 जणांचा प्राण घेतला. त्या तडाख्यात किमान 167 मच्छिमार बेपत्ता झाले. असे हे विध्वंसकारी चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकू लागल्याने नागरिकांत धास्तीचे वातावरण होते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हे वादळ मुंबईला स्पर्श करेल, असा अंदाज होता. मात्र तत्पूर्वी ते शमले व पुढील धोका टळला. मात्र मुंबई, ठाणे तसेच रायगडसह कोकणपट्टीतील अनेक भागांनी मंगळवारी जणू पावसाळाच अनुभवला. वादळाच्या धास्तीने शाळांना सुट्टी देण्यात आली होतीच, शिवाय विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही नेहमीच्या तुलनेत कमी होती. मुंबईतील रस्ते व रेल्वे वाहतूक पावसाने मंदावली. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसानंतर अनेक घरांत पाणी शिरले. या पावसात, वादळात भरकटलेल्या सुमारे 600 मच्छिमारी नौका दिघी बंदरात आश्रयाला आल्या आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews