नागपूर : कोरोनामुळे होणारे मृत्यू आधी दिवसाला मोजले जात होते, आता प्रती तास मोजावे लागत आहेत. दर तासाला दोन रुग्ण मरत आहेत. पण अशा भयावह परिस्थितीत राज्य सरकार उपाययोजना करण्याचे सोडून जनतेला संभ्रमित करण्याचे काम करीत आहे. राज्य सरकारने किमान कोरोनाच्या विषयात तरी राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. हे असेच सुरू राहिले तर उद्या लोक रस्त्यावर मरतील, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महापौर संदीप जोशी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या समर्थनार्थ जनतेला आवाहन करण्यासाठी नागपुरातील बडकस चौकात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गडचिरोली : कोरोना विषाणूची साथ आता गडचिरोली जिल्ह्यातही वेगाने पसरत आहे. थुंकीमधून हा अतिलागट विषाणू पसरत असल्याने एकाचे थुंकणे सर्वांना घातक ठरते आहे. खर्रा, तंबाखू खाणारे स्वत:ला कॅन्सर व इतरांना कोरोना देतात. त्यामुळे कोरोनापासून रक्षणासाठी खर्राविक्री व पानठेले बंद करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी केले आहे.
अमरावती : विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या वरुड परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार आहेत. नरखेड-अमरावती हा रेल्वेमार्ग संत्रा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने आता शेतकऱ्यांना थेट बांगलादेशापर्यंत संत्री नेता येणार आहेत. त्यामुळे देशभरातील मोठ्या बाजारपेठांशी शेतकरी प्रत्यक्ष जोडला जाणार असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळणार असून संत्र्याची महती व गोडवा अधिक वाढणार आहे.
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कानपा येथील आश्रमशाळेत गडचिरोली जिल्ह्यातील दोनशे विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते. परंतु कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. दुर्गम भागात ऑनलाइनची सोय नाही. त्यामुळे नदी, नाले तुडवत आणि पायी चालत शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पुस्तके पोहोचवली. दुर्गम आणि डोंगराळ भागात ४ ते ५ किलोमीटर पायी डोक्यावर पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचावे लागले. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
?